मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४


शैक्षणिक मानसशास्त्र



मानवी विकास, प्रेरणा, अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन आणि त्या संदर्भात होणाऱ्या आंतरकियां- 

         संबंधी केलेले मानसशास्त्राचे व मानसशास्त्रीय पद्घतींचे उपयोजन. उपयोजित मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा. या शाखेत शैक्षणिक अध्ययन-अध्यापनाच्या क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करण्यात येते. व्यक्तीच्या सुप्तगुणांचा पर्याप्त विकास होऊन ती सक्षम होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे असते, त्या त्या सर्व गोष्टींचा शैक्षणिक मानसशास्त्रात विशेषत्वाने अभ्यास केला जातो

    शैक्षणिक मानसशास्त्राच्या प्रगतीचा ऐतिहासिक आढावा घेतल्यानंतर ग्लोव्हर व रोनिंग या मानसशास्त्रज्ञांनी १९८७ साली त्याची व्याप्ती स्पष्ट केली. त्यांच्या मतानुसार या शास्त्रामध्ये मानवी विकास, व्यक्तिभेद, अध्ययन, प्रेरण, मापन या सर्वांचा समावेश होतो. हे शास्त्र सिद्घांत व प्रदत्तांपासून मिळालेले संशोधनांचे निष्कर्ष या दोहोंवर अवलंबून असते. या दृष्टीने पाहता शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययनप्रकियेच्या बाबतीत सुप्त उपयोजन फार मोठे आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट सक्षमता व व्यक्तिमत्त्व यांच्या विकासाशी व ज्ञानसंवर्धनाशी निगडित आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक मानसशास्त्रातील सिद्घांतांचे व संशोधनाचे उपयोजन औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण, मुक्त शिक्षण, प्रौढशिक्षण, अपंगांचे शिक्षण, व्यवसाय शिक्षण, दूरशिक्षण यांसारख्या सर्व प्रकारांतून करण्यात येते.

  शिक्षण म्हणजे सामाजिक वास्तवाचे भान, असा अर्थ घेतल्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक संस्थांचा, अभ्यासकमांचा, अध्ययनपद्घतींचा साकल्याने केलेला संशोधनात्मक अभ्यास, असे म्हणता येईल. फलनिष्पत्तीच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार केल्यास, शिक्षण घेण्यास पात्र असलेले व शिक्षण पूर्ण केलेले यांचा विशेष अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्र करते. व्यक्तीला व समूहाला पभावित करणारे वर्तन, असा शिक्षणाचा अर्थ घेतल्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शिक्षणविषयक परिस्थितीच्या संदर्भातील मानसशास्त्रीय घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र, असे म्हणता येईल. या संदर्भात विविध मानसशास्त्रीय तंत्रे व पद्घती विकसित केल्या जातात.

साधारणपणे विसाव्या शतकारंभी शैक्षणिक मानसशास्त्राला स्वतंत्र शास्त्रशाखेचा दर्जा प्राप्त झाला. अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली शैक्षणिक मानसशास्त्राची पहिली पाठ्यपुस्तके १८७९ (अलेक्झांडर बेन) व १८८४ (जेम्स सली) मधील आहेत. स्विस समाजसुधारक ⇨ योहान हाइन्रिक पेस्टालोत्सी याच्या विचारांचा शैक्षणिक मानसशास्त्रावर बराच प्रभाव पडला. त्याच सुमारास हॉल, एबिंगहाऊस, गॉल्टन इत्यादींनी केलेल्या संशोधनाने शैक्षणिक मानसशास्त्रास चालना मिळाली. १९०५ साली बीने-सीमोन बुद्घिमापन चाचणीने शैक्षणिक मानसशास्त्रात नवे पर्व सुरु झाले. गॉडर्ड (१९०८), टर्मन (१९१६) यांचे त्यासंबंधीचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरले. पहिला शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ म्हणून ⇨ एडवर्ड थॉर्नडाइक यांना जगभर मान्यता मिळाली. त्यांनी केलेले प्राण्यांच्या बुद्घिमत्तेवरील संशोधन व अनुबंधवादासंबंधीचे नवे सिद्घांत सर्वमान्य झाले.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत अध्ययन, शीण वा थकवा, अध्ययनवक इत्यादींसंबंधी बरेच संशोधन झाले. झां प्याजे, थॉर्नडाइक, वायगोटस्काई यांसारख्या संशोधकांच्या अभ्यासातून विकासात्मक
मानसशास्त्र, बालमानसशास्त्र यांचा परिचय झाला. दोन महायुद्घांच्या दरम्यान मनोविश्लेषण समष्टिवाद व मनोमापन या विषयांतील अभ्यासांनी शैक्षणिक मानसशास्त्र समृद्घ केले. दुसऱ्या महायुद्घानंतर अध्ययन- अध्यापनाविषयी विविध सिद्घांत व तत्त्वे पुढे आली. प्रायोगिक मानसशास्त्राच्या अचूक पद्घती, प्रदत्तांचे नेमके विश्लेषण, शास्त्रीय पद्घतीने केलेले निरीक्षण, यांतील प्रगतीमुळे शैक्षणिक मानसशास्त्र अधिक समृद्घ झाले. प्रगत देशांतील अनेक विद्यापीठांतून व महाविद्यालयांतून एक स्वतंत्र विषय म्हणून तसेच स्वतंत्र शैक्षणिक विभाग म्हणून शैक्षणिक मानसशास्त्रास स्थान लाभले. अशा विभागांमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या अंतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. तसेच संशोधनासाठी व उपयोजनासाठी बालमानसशास्त्र, शालेय मानसशास्त्र, मार्गदर्शन व उपयोजन, मनोमापन यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध असतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अनेक विद्यापीठांत वाचनासारख्या विषयावर अद्ययावत उपकरणांच्या आधारे सुसज्ज प्रयोगशाळेत विशेष संशोधन करण्यात येते. शिक्षक प्रशिक्षणातही शैक्षणिक मानसशास्त्राचा अंतर्भाव आहे.

साधारणपणे एकोणिसाव्या शतकापर्यंत या शास्त्रासंबंधी सैद्घांतिक व वर्णनात्मक पुस्तके प्रसिद्घ झाली. पुढे प्रगत संशोधनामुळे प्रत्यक्ष शास्त्रीय चाचण्या, त्यांचे निष्कर्ष, अध्ययनासंबंधीचे विविध बारकावे, यांवर भर देणारी पुस्तके निर्माण होऊ लागली. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विद्यार्थी हा केंद्रस्थानी मानून केलेला बालमानसशास्त्र व वाढत्या वयाच्या मुलांच्या मनोवृत्तींचा, विकासाचा, क्षमतांचा व अध्ययन पद्घतींचा अभ्यास यांवर भर देण्यात आला. प्राणिमानसशास्त्र, मनोविकृतिशास्त्र यांच्या साहाय्याने नव्या संकल्पना उपलब्ध झाल्या. बालकांमध्ये अंगभूत नकारात्मक वृत्ती असतात, असे पूर्वीचे सिद्घांत चुकीचे ठरले. तसेच आनुवंशिकता महत्त्वाची की परिस्थिती, यांवर खूपच चर्चा झाली. मानवी विकासात दोहोंची भूमिका महत्त्वाची आहे, असा निष्कर्ष मान्य झाला. शास्त्रशुद्घ विश्लेषणामुळे या दोन्ही घटकांच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक बाबी उजेडात येऊन त्यांच्यातील आंतरकियेची गुंतागुंत लक्षात आली. व्यक्तिविशिष्टता व व्यक्तिभेद यांना महत्त्व प्राप्त झाले. अध्ययनाच्या बाबतीत मनासारख्या कल्पित गोष्टी मागे पडून मेंदूचा विचार होऊ लागला. शरीर व मेंदूचे कार्य यांचा परस्परसंबंध व व्यक्तीचे वर्तन यांचा साकल्याने विचार होऊ लागला. अध्यापनही अध्यापक केंद्रित न राहता विद्यार्थी केंद्रित बनले. पूर्वी अध्यापनासंबंधीचे सर्व निर्णय अध्यापक स्वतःच घेई; पण आता विद्यार्थ्यांची क्षमता, अभिक्षमता, कल, अध्ययनक्षमता, वय यांनुसार शिकवावे असा दृष्टिकोन प्रभावी ठरला. निदर्शित अध्ययनाची कल्पना अधिक मान्यता पावत आहे. अध्ययनासाठी पोषक उपयुक्त अशी वातावरणनिर्मिती करणे, तसेच अध्ययनाला साहाय्य करणे म्हणजे अध्यापन, अशी विचारसरणी आता रुढ झाली आहे. अध्यापकाचे व्यक्तिमत्त्व व अध्यापनाची कौशल्ये यांसंबंधी संशोधन होऊ लागले. जे. एम्. कॅटेल या मानसशास्त्रज्ञाने १९३१ मध्ये केलेल्या संशोधनातून अध्यापकाचे व्यक्तिमत्त्व व कार्य यांसंबंधी एक व्यापक विचार स्पष्ट झाला. अध्ययन-अध्यापनाबाबत विद्यार्थ्यांची व शिक्षकांची सर्वेक्षणे करण्यात आली व त्यांतील निष्कर्ष मार्गदर्शक ठरले.

ध्ययनाच्या परिणामकारकतेचे मापन करण्यासाठीही संशोधन सुरु झाले. बुद्घिमापनाची संकल्पना पुढे आली, पण लवकरच तिच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. चारित्र्याची कल्पनाही व्यक्तिमत्त्वाच्या कल्पनेपेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले. मूल्यशिक्षणाचा विचार पुढे आला. मनोविकृतीच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्वाचा विशेष विचार होऊ लागला. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतील परिस्थितीचा घटकही अभ्यासनीय ठरला.

शैक्षणिक मानसशास्त्रातील सैद्घांतिक विकासही वेगाने होत राहिला. परंपरागत शिस्तीच्या संकल्पना व सिद्घांत बदलू लागले. थॉर्नडाइक यांनी उद्दीपक व प्रतिकिया यांच्यातील संबंध दृढ करणे, म्हणजेच अध्ययन असा सिद्घांत मांडला. बी. एफ्. स्कीनर यांनी अध्यापन म्हणजे वर्तन बदलण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना, असे मत मांडले (१९५७). त्यामुळे शिक्षणप्रकियेसंबंधीचे शास्त्र हे उपयोजित शास्त्र बनले. वेल्थी फिशर यांच्या मतानुसार शिक्षणाच्या मानसिक अंगांचा विचार करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. पुढे वर्तनवाद व समष्टिवाद यांचा शैक्षणिक मानसशास्त्रावर प्रभाव वाढला. गॅग्ने यांच्या मतानुसार (१९६७) अध्ययन विविध प्रकारांमध्ये घडते. त्यांचा परस्परसंबंध व त्यांचे परस्परावलंबन विशिष्ट प्रकारच्या उतरंडीतून स्पष्ट करता येते. १९५४ मध्ये ए. एच्. मॅस्लो यांनी तर १९६७ च्या सुमारास मक्लेलंड व अटकिन्सन यांनी प्रेरणा व यश यांच्यातील परस्परसंबंधाचे महत्त्व स्पष्ट केले. यशाची आशा, अपयशाची भीती, शिकण्याची इच्छा, निंदा-स्तुती इत्यादींचा अध्ययनावर होणारा परिणाम स्पष्ट झाला. अध्यापनाची सर्वसामान्य तत्त्वे अध्यापनाच्या विविध पद्घतींचे विश्लेषण, शिक्षकाची महत्त्वपूर्ण भूमिका, यांचा विशेष विचार होऊ लागला. अलीकडच्या काळात शिक्षकाच्या विशिष्ट वर्तनप्रकारांचा व अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्घतींचा अध्ययनावर कसा परिणाम होतो, याविषयी संशोधन होऊ लागले. तसेच अध्ययनविषयक प्रेरणेवर प्रभाव पाडणारे विविध घटक, अध्यापनपद्घतीमुळे अध्ययनात निर्माण होणारी गोडी, अध्यापनातील तंत्रज्ञान यांवर अधिक भर देण्यात आला. व्यक्तिभेदाच्या तत्त्वाबरोबरच व्यक्तिकेंद्रित विचारसरणी पुढे आली. शैक्षणिक व व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शनाची अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना रुजली. बॅकमन व सेकॉर्ड (१९६८) यांनी सामाजिक संदर्भ व परिस्थितीबाबतची भूमिका अग्रक्रमाने मांडली. बर्नस्टीन यांनी सामाजिक व सांस्कृतिक घटकांमध्ये कित्येक प्रेरणांचे मूळ असते हे दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कौटुंबिक वातावरणाचा घटक महत्त्वाचा असतो, हे अलीकडील संशोधनातून स्पष्ट झाले.

शैक्षणिक मानसशास्त्र ही विकसनशील शास्त्रशाखा आहे. म्हणून आज ती परिपूर्णावस्थेत आहे, असे नाही. तसेच या शास्त्रात सैद्घांतिक भूमिकांच्या संदर्भात वादाचे मुद्देही बरेच आहेत. तथापि मानसशास्त्राचे शैक्षणिक उपयोजन अत्यंत उपयुक्त आहे. हे उपयोजित शास्त्र असल्याने त्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवरील मूलभूत संशोधन मर्यादित झालेले आढळते. शैक्षणिक मानसशास्त्राच्या उपयुक्ततेबाबत तसेच उपयोजन होण्याबाबत समाजात अधिक जागृती होण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही मूलभूत संकल्पना यशस्वी रीत्या राबवल्या जातात, हे पुरेसे नाही. विद्यापीठातील शिक्षकांना शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास अनिवार्य नाही. त्याचप्रमाणे शैक्षणिक मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांत विद्यार्थ्यांच्या जीवनातील अधिक उदाहरणे व सर्वेक्षणे अपेक्षित आहेत. केवळ सिद्घांतांचे संकलन उपयुक्त ठरत नाही, तर उपयोजनांचे प्रकार व प्रयोग यांवर भर देणे योग्य ठरेल.



बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४



बालमानसशास्त्र



अध्यापन व अध्यापनपद्धति : 

                अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अध्यापन हा शब्द प्रयोजक आहे. ‘शिकावयास प्रेरणा देणे’ हा त्याचा अर्थ होय. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीनेही प्रेरणा व मार्गदर्शन हेच अध्यापनाचे सारसर्वस्व होय. अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. त्यात उद्दिष्टे, अभ्यासक्रम, अध्ययनप्रसंगांची योजना, अध्यापन पद्धती आणि उद्दिष्टांच्या सफलतेचे मूल्यमापन या पाचही गोष्टींचा समावेश होते. संपूर्ण अध्यापन-प्रक्रियेचा अध्यापनपद्धती हा एक महत्त्वाचा भाग होय.

            शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्कारसुमुच्चयाला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते; पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली . या शालेय वा संस्थांतर्गत शिक्षणाला ‘औपचारिक किंवा रीतसर शिक्षण’ म्हणतात. घरातील आईवडील प्रसंगानुसार मुलांना शिकवतात, त्यांच्या चारित्र्यविकासाकडे लक्ष देतात. आई हा सर्वांत श्रेष्ठ गुरू, पिताही गुरू, असे याचसाठी मानले जाते.

            अध्यापनक्रियेचे स्वरूप फार व्यापक आहे. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. शिक्षण व जीवन यांचा परस्परसंबंध आहे; ज्ञानाकरिता ज्ञान हे जसे एका अर्थी युक्त आहे, तसेच शक्य तेथे व्यवहारातही त्याच उपयोग करता आला पाहिजे, हेही युक्त आहे. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर ज्ञानाचे उपयोजन आणि कौशल्यांची प्राप्ती यांनाही महत्त्व दिले पाहिजे. तसेच अनेक दृष्टीकोन व मूल्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होतात. अध्यापन म्हणजे केवळ ज्ञानसंक्रमण नसून विद्यार्थांच्या आकलनशक्तीचा व विचारशक्तीची विकास करणारे, त्यांना विविध कौशल्यांची प्राप्ती करून देणारे, त्यांना चांगल्या सवयी लावणारे, त्यांच्या अभिरूचीचा व सौंदर्यदृष्टीचा विकास करणारे, त्यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनाची व मूल्यांची जोपासना आणि त्यांच्या सर्जनशील शक्तीचा व विवेकबुद्धीचा विकास करणारे अध्यापकाचे कार्य, म्हणजे अध्यापन होय.

              अध्यापन व अध्यापन या प्रकिया एकमेकींशी निगडित आहेत. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. विद्यार्थी शिकला याची साक्ष त्याच्या वर्तनात दिसते. जे समजले नव्हते ते समजले व जे करता येत नव्हते ते करता येऊ लागले, म्हणजे शिक्षण झाले. म्हणून अध्ययन म्हणजे संस्कारग्रहण आणि वर्तनात परिवर्तन व ते घडविण्यास साहाय्य करणे म्हणजे अध्यापन. शिक्षक व विद्यार्थी यांतील क्रियाप्रतिक्रियांच्या या दोन बाजू आहेत, म्हणून शिक्षण ही द्विध्रुव-प्रक्रिया समजली जाते.

               विद्यार्थ्यावर होणाऱ्या संस्कारांत शिक्षकाचा वाटा मोठा असतो. शिक्षकाच्या आचारविचारांचा प्रभाव संस्कारक्षम विद्यार्थ्यावर होत असतो. यासाठी प्राचीन काळातील आचार्य सदाचारसंपन्न व शीलसंपन्न राहण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळेच गुरूची योग्यता मोठी मानली जाई. अध्यापकाची प्रतिष्ठा बऱ्याच अंशी त्याच्या विविध प्रकारच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्या बाबतही अनेक प्रकारचे संशोधन अलीकडे झाले आहे. या गुणवत्तेची सामान्यत: चार क्षेत्रे मानण्यात येतात : (१) अध्यापन विषयाचे क्षेत्र-जे विषय शिकवावयाचे त्यांवर उत्तम प्रभुत्व, ते विषय विद्यार्थ्यांना समजावून देण्याचे कौशल्य, स्वत:चा व्यासंग अद्ययावत ठेवण्याची धडपड, अध्यापनसाधनांचे ज्ञान व त्यांचा कौशल्यपूर्ण उपयोग करण्याचे सामर्थ्य यांचा समावेश या पहिल्या क्षेत्रात होतो. (२) मानसशास्त्राचे ज्ञान—विशेषत: बाल, किशोर व कुमार यांचे मानसशास्त्र शिक्षकाला उत्तम अवगत हवे. (३) मानवी संबंधांचे क्षेत्र—शिक्षकाला विद्यार्थी, सहव्यवसायी व संचालक यांच्यात काम करावयाचे असते. तसेच त्याचा पालकांशी व समाजाशी संबंध येतो.या सर्वांशी वागण्याचे ज्ञान व कला शिक्षकाजवळ असली पाहिजे. (४) नेतृत्व—शिक्षक हा विद्यार्थ्याचा नेता व मित्र असतो. लोकशाही समाजातील नेत्याचे गुण त्याच्या ठिकाणी असले पाहिजेत. विद्यार्थ्याविषयी प्रेम, सहानुभूती व आस्था असणारा शिक्षक हाच उत्तम शिक्षक होऊ शकतो. शिक्षकाची ही गुणवत्ता अध्ययनाने, प्रशिक्षणाने व प्रयत्नाने वाढत असते. अध्यापन करीत असताना शिक्षकाची वृत्ती व दृष्टीकोन ही लोकशाही स्वरूपाची आहेत की उदासीन आहेत किंवा हुकूमशाहीची आहेत, यालाही फार महत्त्व आहे. पहिल्या प्रकाराचा दृष्टिकोन असल्यास विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो व तो स्वतंत्र वृत्तीचा व सहकारशील बनतो, असा प्रयोगांचा निष्कर्ष आहे.

अध्यापनपद्धती : 
          
             अध्यापनपद्धतीचे स्वरूप एका बाजूने शिक्षणाच्या उद्दिष्टांशी निगडित असते, तर दुसऱ्या बाजूने मन व ज्ञानार्जन यांसंबंधीच्या रूढ कल्पनांशी निगडित असते. त्यामुळे अध्यापनपद्धतीचे स्वरूप बदलत गेल्याचे दिसते. प्राचीन काळात धर्मज्ञान हे स्वर्गप्राप्ती, मुक्ती, पापनाश वा पुण्यप्राप्ती यांचे साधन मानले जात असल्याने व प्रमाणभूत ग्रंथ वा व्यक्ती यांच्याकडून ते मिळवावयाचे असल्याने, गुरूकडून ते ऐकावयाचे व मुखोद्गत करावयाचे, हीच पठणपाठणपद्धती अस्तित्वात होती. व्यावाहरिक शिक्षण उमेदवारीने घेतले जाई. त्यात निरीक्षण व अनुकरण यांवरच भर असे. या परंपरागत पद्धतीला धक्का देण्याचे पहिला प्रयत्न सॉक्रेटीसने केला. शिकणाऱ्याला प्रश्न व प्रतिप्रश्न करून, त्यालाच विचार करायला लावून ज्ञानाचा शोध घेण्याची पद्धती त्याने रूढ केली. या संवादात्मक व प्रश्नप्रधान पद्धतीलाच पुढे ‘सॉक्रेटीसची पद्धती’ हे नामामिधान मिळाले. आपल्या प्राचीन उपनिषदात ही पद्धती आढळते; परंतु ही पद्धती फार काळ टिकली नाही. सॉक्रेटीसनंतरच्या जवळजवळ हजार वर्षांच्या काळात खिस्ती धर्ममठांतून पुन्हा पूर्वीची पाठांतरपद्धती रूढ झाली. पवित्र ग्रंथाचे वाचन व पठण एवढेच त्या काळात शिक्षणाचे उद्दिष्ट होते.
               
            सोळाव्या शतकापासून या शब्दनिष्ठ पद्धतीविरूद्ध प्रतिक्रिया सुरू झाली. कोमीनियस हा त्या प्रतिक्रियेचा आद्य प्रतिनिधी व नव्या पद्धतीचा जनक होय.
             
           बालकांना परिचित व मूर्त वस्तूंचे प्रथम ज्ञान करून द्यावे व नंतर अपरिचित व अमूर्त कल्पनांकडे न्यावे, तसेच बालस्वभावाच्या विकासाशी अध्यापनपद्धती मिळतीजुळती असावी, असे प्रथम त्याने सांगितले. अध्यापन मूर्त करण्यासाठी चित्रमय पुस्तके रचण्याच्या उपक्रम त्याने केला. त्यानंतर प्रचलित शिक्षणपद्धतीला जबरदस्त धक्का दिला तो रूसो याने. रूसो हा बालककेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. शिक्षणात अनुभव व कृती यांना त्याने स्थान दिले. बालकाच्या स्वातंत्र्याचाही तो पुरस्कर्ता होता. रूसोच्या कल्पना प्रत्यक्षात पडताळून पाहण्याचे कार्य पेस्टालोत्सीने केले व त्यांतील उणिवा ओळखून नवी भर घातली. अध्यापनपद्धतीला मानसशास्त्राची बैठक त्याने मिळवून दिली. पेस्टालोत्सीच्याच शाळेत त्याचा सहकारी म्हणून काम करून स्वत:ची अध्यापनपद्धती निर्माण करणारा तत्त्वज्ञ म्हणजे फ्रबेल हा होय. त्याच्या मताप्रमाणे बालकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त शक्ती फुलविणे हेच शिक्षकांचे कार्य. म्हणून बालमनाच्या कळ्या फुलविणाऱ्या शिक्षकाला त्याने माळ्याची उपमा दिली व त्या पद्धतीला बालोद्यान असे नाव दिले. अध्यापनात क्रीडाप्रवृत्तीला वाव देऊन भाषा, इतिहास इ. विषय शैशवकुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम इंग्लंडमध्ये कॉल्डवेल कुक याने पुढे केला. त्याने आपल्या पद्धतीला ‘क्रीडापद्धती’ असेच नाव दिले.
            
            पूर्वोक्त प्रयोग पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या स्तरांवरच होते. माध्यमिक स्तरावर अध्यापनपद्धतीला नवे वळण लावण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम हेर्बार्ट याने केला. हेर्बार्टच्या पद्धतीची छाप इंग्लंड, अमेरिका व भारत या देशांतील अध्यापनावर अजूनही आहे. ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेत हेर्बार्टने कल्पनांचे साहचर्य यावर विशेष भर दिला आणि त्यातून अध्यपनाचे नवे तंत्र निर्माण केले. पूर्वतयारी उपन्यास, साहचर्य, सामान्यीकरण व उपयोजन या पाच पायऱ्या अथवा पंचपदी हेर्बार्टच्या तंत्रातून त्याच्या शिष्यांनी निर्माण केली. गणित, विज्ञान, भूगोल इत्यादींच्या अभ्यासाला त्या काळात महत्त्व होते. त्या विषयांच्या अध्यापनाला हे तंत्र चटकन लागू पडले व लोकप्रियही झाले. परंतु हेर्बार्टच्या तंत्राला पुढे यांत्रिक व कृत्रिम स्वरूप आले.
           
         फ्रबेलच्या बालविकासाचे सूत्र घेऊन बालकांच्या शिक्षणाचा प्रयोगशील दृष्टीने अधिक विचार मारिया माँटेसरी या शिक्षणतज्ञेने केला. द्ररिद्री व मंदबुद्धी असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रयोग करून तिने आपली पद्धती शोधून काढली. ‘बालक-मंदिर’ या नावाने तिची संस्था ओळखली जाते. या मंदिरात इंद्रियशिक्षण देणाऱ्या व इतर उपकरणांच्या साहाय्याने मुले स्वप्रयत्नाने बुद्धिविकास साधतात व सामुदायिक जीवनातून सामाजिक विकास व आत्मनियंत्रणाची सवय आत्मसात करतात.
              
           अमेरिकेत शब्दनिष्ठ अध्यापनाविरूद्ध टीका बरीच जुनी आहे. शिकवणे म्हणजे संशोधन, नवा अनुभव घेणे, या विचारांचा पुरस्कार प्रथम आर्मस्ट्राँग याने केला व ‘ह्यूरिस्टिक पद्धती’ शोधली. भूगोल, विज्ञान, गणित आदी विषयांना ती विशेष उपयुक्त आहे. भूगोल, विज्ञान या विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गाकडे जाणे, सहली काढणे इ. उपक्रमांना फ्रॅन्सिस पार्कर याने आरंभ केला. पण अनुभवनिष्ठ व कृतियुक्त शिक्षणाला चालना दिली ती जॉन ड्यूई यांनी. जॉन ड्यूई यांनी शिकागो विद्यापीठाला जोडलेल्या प्राथमिक शाळेत अध्यापनपद्धतीबाबत नवे प्रयोग केले. आपण शिकतो म्हणजे कृतीद्वारा प्रयोग करतो. शिकण्यासाठी काही प्रयोजन वा हेतू लागतो. हे प्रयोजन गरजांतून वा समस्यांतून मिळते. समस्या-उकल हीच खरी शिकण्याची पद्धती, तीतूनच बौद्धिक विकास होतो आणि असे अध्यन समाजात घडत असल्याने सामाजिक विकासही होतो. अनुभवाची देवाणघेवाण ही शिकण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. सध्याच्या परिवर्तनशील जगात व्यक्तीच्या ठिकाणी नव्या परिस्थितीशी सामंजस्य राखण्याचे ज्ञान व कौशल्य आले पाहिजे, अशी ड्यूईची विचासरणी आहे. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून समाजाची अखंड प्रगती साधण्यास आवश्यक अशा पद्धतीचे विवेचन ड्यूईने केले.
               सामुदायिक जीवनातून व सप्रयोजन-कृतीतून मिळणारा अनुभव म्हणजे शिक्षण, या विचारातूनच किलपॅट्रिक यांची योजना-पद्धती वा प्रकल्प-पद्धती निर्माण झाली. प्रकल्प-पद्धतीचा मुख्य भर विद्यार्थ्यांतील उपक्रमशीलता, स्वतंत्र विचारशक्ती, जबाबदारीची जाणीव व सहकार्यप्रवृत्ती वाढविण्यावर आहे. विद्यार्थ्यांनी माहितीचे भारे डोक्यात रिचविण्याऐवजी ज्ञानाचा खरा उपयोग करण्यास शिकावे, ही तिच्यात दृष्टी आहे.
                अमेरिकेप्रमाणेच यूरोपमध्येही बालमानसशास्त्रावर आधारित अशा कृतिशील शिक्षणाची चळवळ विसाव्या शतकात सुरू होती.
प्राचीन भारतातील अध्यापद्धती अध्ययनविषयाला धरून असल्याने तिच्यात विविधता आढळते. तदनंतरचे मध्ययुग व ब्रिटिश राजवटीपासूनचा आधुनिक काळ, असे पुढचे दोन कालखंड आहेत.

                 प्राचीन काळी वेदत्रयींचे अध्ययन गुरूकडून संथा घेऊन होई. ते ग्रंथ कंठस्थ करण्याची पद्धती होती; पण वेदांगांच्या साहाय्याने वेदमंत्राचा अर्थ व विनियोग समजून घ्यावा लागे. श्रवणाबरोबरच मनन व निदिध्यास यांवरही भर असे. कृषी, पशुपालन, वाणिज्य, स्थापत्य, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सुतारकाम, धातुकाम यांसारखे ज्ञानाचे विषयही असत. तक्षशिला, नालंदा यांसारख्या विद्यापीठांतील उच्च शिक्षणात वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नप्रतिप्रश्न यांवर व चिकित्सक बुद्धीचा परिपोष करण्यावर कटाक्ष असे. संस्कृत-प्राकृतातील प्रचंड टीकासाहित्य व भाष्ये हे त्याचे फळ आहे. धनुर्विद्या, आयुर्वेद अन्य व्यवहारोपयोगी विद्या व कला यांत प्रत्यक्षिकांचा भाग मोठा असे. पाठांतराच्या बरोबरीनेच निरीक्षण, अनुकरण, मार्गदर्शन व चिंतन यांवरही भर होता.

               मध्ययुगात चिकित्सक अध्ययनाची परंपरा लोपली. पाठांतराने वेदविद्या जिवंत ठेवण्याचीच धडपड करावी लागली. अन्य शास्त्रे व विद्या ग्रंथांतच राहिल्या. सामान्य जनांना लेखन-गणनाचे प्राथमिक शिक्षण तेवढे मूळाक्षरे गिरवून मिळे. त्यात विशिष्ट पद्धती नव्हती. व्यवसायांचे शिक्षण परंपरेने व उमेदवारी करूनच मिळवावे लागे.

               ब्रिटिश अमदानीत ब्रिटनमधील अध्यापनपद्धतीच येथील शिक्षणात रूजल्या. प्राथमिक स्तरांवर घोकंपट्टीच्या जोडीला वस्तुपाठपद्धती सुरू झाली. माध्यमिक स्तरावर हेर्बार्टची पंचपदी व प्रश्नोत्तरपद्धती यांचा अवलंब झाला. इंग्रजीसारखी परकी भाषा शिकण्यासाठी प्रत्यक्षपद्धती व संवादपद्धती रूढ झाल्या. अलीकडे मूलभूत घटकरचनांवर आधारलेली पद्धती उपयोगात आणली जात आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणात फ्रेबेल व माँटेसरी यांचे अनुकरण झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांत केवळ पुस्तकी शिक्षण देत व माध्यमिक शिक्षणात इंग्रजी माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होई. या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी काही संबंध नसे. या सर्वांचे दुष्परिणाम टाळून, जीवन जगत असताच जावनाची तयारी करून देणाऱ्या उद्योगमूलक शिक्षणाची कल्पना म. गांधींनी पुढे मांडली. ‘नयी तालिम’, ‘बुनियादी शिक्षा’ अशा नावांनी ती ओळखली जाते. एखादा उत्पादक व्यवसाय—उदा., शेती, सूतकताई—घेऊन त्याभोवती भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे इत्यादींचे अध्ययन गरजेप्रमाणे गुंफावयाचे, अशी तिच्यात कल्पना आहे. म्हणजे समवाय (गुंफणे) हे अध्यापनाचे मुख्य सूत्र. त्यामुळे ज्ञानाचे चांगले आकलन होते व त्याचा उपयोग कळतो. हा उद्योग सामुदायिक वातावरणात करावयाचा असल्याने विद्यार्थाचा सामाजिक विकासही त्यात घडून येतो.

              आजच्या प्राथमिक शाळांतील पद्धती हे अनेक पद्धतींचे एक मिश्रण आहे. प्राथमिक शिक्षणात बालकांची कृतिशीलता, क्रीडाप्रवृत्ती, त्यांच्या गरजा आणि प्रत्यक्ष अनुभव-निरीक्षण यांच्यावर भर देण्याकडे कल आहे. माध्यमिक शिक्षणात हेर्बार्टच्या पंचपदीला प्रश्नोत्तरे, चर्चा, निरीक्षण, प्रयोग इत्यादींची जोड देण्यात आली आहे.काही शाळांतून स्वाध्याय व प्रकल्पपद्धतीचाही थोडाफार अवलंब केला जातो. उच्च शिक्षणात व्याख्यान व विवरण यांचाच प्राय: अवलंब केला जातो. तसेच व्याख्यान, चर्चा, परिसंवाद, कृतिसत्रे, प्रयोगशाळा यांचाही हळूहळू प्रसार होत आहे. काही महाविद्यालयांत स्वाध्यायपद्धतीवरही भर आहे.

                    पाठाचे नियोजन व तंत्र: वर्षभरात शिकवावयाचा पाठ्यक्रम शिक्षकांना उपलब्ध करून दिला जाई. वर्षाचे तीन वा चार विभाग करून प्रत्येक विभागात किती पाठ्यक्रम पुरा करावयाचा, ते ठरविले जाई. पुढे ही वाटणी महिनावार, सप्ताहवार वा दैनंदिनही केली जाई. पाठ्यक्रम संपविणे म्हणजे त्या विषयाचे पाठ्यपुस्तक संपविणे, अशीच प्राय: समजूत असल्याने पाठ्यपुस्तकांच्या पृष्ठांची वाटणी म्हणजे अध्यापनाचे नियोजन समजले जाई. यात सुधारणा होऊन पाठ्यक्रमातील विषयांची यादी करून एकेक भाग किती दिवसांत व तासांत संपविता येईल, याचा विचार होऊ लागला.

                    मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापनपद्धती यांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पाठनियोजनाच्या कल्पना बदलल्या. अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्ञानग्रहणप्रक्रियेला मदत करण्याचे काम. प्रत्येक विषयाच्या अध्यापनाची उद्दिष्टे नमूद करून विद्यार्थ्याच्या वर्तनात कोणते परिवर्तन घडवून आणावयाचे, त्याची आकलनशक्ती व कौशल्य यांत कोणती भर घालावयाची, यांचा प्रथम विचार केला जातो. ही उद्दिष्टे पार पाडण्यासाठी पाठ्यक्रमातील उपयुक्त घटक शोधले जातात. या घटकांची सुव्यवस्थित जुळणी कशी करावयाची व त्यासाठी कोणती अध्यापनसामग्री उपयोगी पडेल, याचा विचार केला जातो. त्यानंतर अध्ययन-प्रसंगाचा विचार होतो. हे अध्ययन-प्रसंग म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभव घेण्याची संधी. एखादी समस्या सोडविण्यासाठी, काही नवीन रचना करण्यासाठी किंवा नव्या विषयांचे आकलन करण्यासाठी शिक्षक—विद्यार्थ्यांनी करावयाच्या कृती, हा अध्ययन-प्रसंगाचा भाग होय. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता येईल, विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीनुसार प्रगती करण्याला साहाय्य कसे करता येईल इत्यादींचा विचारही याच वेळी करावा लागतो. अखेरच्या टप्पा मूल्यमापन, म्हणजे विद्यार्थ्याची प्रगती विविध चाचण्यांनी पारखणे, हा होय. पाठनियोजनाची ही शृंखलाबद्ध प्रक्रिया आहे.

               पाठाचा आराखडा: दैनंदिन पाठाची रूपरेषा लिहून काढून आपला पाठ काटेकोर व सुव्यवस्थित करावा, अशी प्रशिक्षार्थी विद्यार्थ्याकडून अध्यापन-विद्यालयात अपेक्षा असते. प्रशिक्षित शिक्षक कागदावर जरी आराखडा लिहित नसले, तरी स्थूल आराखडा त्यांच्या डोळ्यासमोर असतोच. हेर्बार्टच्या पद्धतीनुसार पूर्वतयारी म्हणजे नव्या विषयाशी संबद्ध असलेले विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान तपासणे व पूर्वानुभव जागृत करणे, हा पहिला टप्पा. पाठाची प्रस्तावना व हेतुकथन हेही त्यात समाविष्ट असते. दुसरा टप्पा म्हणजे विषयोपन्यास. शिकावावयाच्या भागाचे दर्शन व विवेचन. प्रश्नोत्तरे, चर्चा, वाचन, निरीक्षण, दृष्टांत यांच्या साहाय्याने विषयाचे स्वरूप ह्या टप्प्यात स्पष्ट केले जाते. तिसऱ्या टप्प्यात सामान्यीकरण वा निष्कर्ष काढणे. चौथा टप्पा मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन व दृढीकरण. अखेरीस विद्यार्थ्यांना स्वाध्याय देणे. 

हा आराखडा पुढील तीन सदरांमध्ये लिहिता येतो : 

(१) उद्दिष्टे
(२) पाठ्यवस्तूचे घटक व उपघटक 
(३) अध्ययन-प्रसंग.

अध्यापनाची सूत्रे : शिक्षकाचे अध्यापन सुगम, सुस्पष्ट व परिणामकारक व्हावे आणि विद्यार्थ्यांची ज्ञानग्रहणाची प्रक्रिया सुकर व्हावी, यासाठी मानसशास्त्राला धरून काही सिद्धांत पुढे आले आहेत. रूसो, पेस्टालोत्सी, फ्रबेल, हर्बर्ट स्पेन्सर व हेर्बार्ट यांच्या सर्वसामान्य नियमांना सूत्रांचे स्वरूप आले आहे. पैकी काही प्रमुख पुढीलप्रमाणे :

(अ) ज्ञाताकडून अज्ञाताकडे : शिकवावयाचा नवा, अपरिचित विषय एकदम पुढे न मांडता परिचित विषयावरून चर्चेला आरंभ करून त्याची कक्षा वाढवीत अज्ञात वा अपरिचिताचे ज्ञान करून द्यावे, असा या सूत्राचा अर्थ. त्यायोगे नवीन विषय शिकणे कंटाळवाणे होत नाही आणि जुन्यानव्या ज्ञानाचा मेळही बसतो.

(आ) सोप्याकडून कठिणाकडे : विद्यार्थ्यांचा उत्साह टिकवूनच शिकवायचे असल्याने सोपा भाग त्यांना समजावून देत क्रमश: कठीण भागाकडे त्यांना नेणे.

(इ) मूर्ताकडून अमूर्ताकडे व (ई) आधी अनुभव, मग नियम : ही दोन्ही सूत्रे जवळजवळ एकाच अर्थाची आहेत. मूर्त वस्तूंच्या संबंधात अनुभव आल्यानंतर त्यांच्या संबंधातील अमूर्त, तर्कशुद्ध नियम विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला जावा. असा या दोन्ही सूत्रांचा अर्थ आहे.

(उ) निसर्गाचे अनुसरण: ‘निसर्ग’ याचा अर्थ ‘बालकाच्या स्वाभाविक प्रेरणा व प्रवृत्ती’ असा आहे. नव्या वस्तूंबद्दल कुतूहल, वस्तूंचा संग्रह, वस्तूंशी चाळवाचाळव व त्यांची घडामोड, क्रीडा, अनुकरण या बालकाच्या सहजप्रवृत्ती आहेत. त्यांचा उपयोग करुन घेतला, तर ज्ञानार्जन हे कष्टप्रद न होता आनंदप्रद होईल.

(इ) पूर्णाकडून विभागाकडे : आधुनिक मानसशास्त्राप्रमाणे कोणत्याही वस्तूचे संपूर्ण रूप वा आकृती प्रथम ग्रहण केली जाते. नंतर तिच्या अंगोपांगांकडे लक्ष जाते. प्रथम संपूर्ण शब्दाकडे व नंतर त्यातील सुट्या अक्षरांकडे मुलांचे लक्ष जाते. या पद्धतीचा अवलंब कथा,चित्रे,कविता इत्यादींच्या रसग्रहणात व प्राथमिक भाषाशिक्षणातही केला जातो.

(ए) विशिष्टाकडून सामान्याकडे व (ऐ) सामान्याकडून विशिष्टाकडे : ही दोन्ही सूत्रे परस्परांना पूरक अशीच आहेत. ही दोन्ही सूत्रे म्हणजे तर्कशास्त्रांतील अनुक्रमे विगामी व निगामी पद्धती होत.

या परंपरागत सूत्रांच्या जोडील आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे प्राथमिक व माध्यमिक स्तरांवर उपयोगी पडणारी पुढील सूत्रेही सांगितली जातात : 
(१) विद्यार्थ्यांना गरज भासली की अध्ययनाचे कार्य सुकर होते. गरज ही मोठी प्ररेक शक्ती आहे. 
(२) जितक्या अधिक ज्ञानेंद्रियांचा उपयोग शिकताना होईल, तितके ज्ञानग्रहण प्रभावी होते. 
(३) विद्यार्थ्यांच्या आस्था-अभिरुचीला आवाहन करून शिकविल्यास अध्ययन रोचक होते. 
(४) विद्यार्थी पाठात सहभागी झाले, तर अध्यापन फलदायी होते. 
(५) विद्यार्थ्यांची मानसिक तयारी व परिपक्वता लक्षात घेतली जावी. 
(६) विद्यार्थांची मने भावनादृष्ट्या स्थिर असतील, तरच त्यांचे अध्ययनाकडे लक्ष लागते. 
(७) धाक-शिक्षेपेक्षा उत्तेजन वा प्रशंसेमुळे अध्ययन परिणामकारक होते.

पाठांचे प्रकार : 
(१) उद्गामी पाठ : या प्रकाराच्या पाठात संकलित माहितीवरून सर्वसाधारण नियम काढावयाचा असतो. ज्यांत विशेषणे वापरलेली आहेत, अशा अनेक वाक्यांच्या निरीक्षणानंतर विशेषणाची व्याख्या मुले तयार करू शकतात. अशा पाठात निरीक्षणासाठी पुष्कळ गोष्टी घेतात आणि व्यावहारिक अनुभवांवरून नियमांचा पडताळा पाहतात. या पद्धतीस शास्त्रीय पद्धत म्हणतात. तिला मानसशास्त्राचाही आधार आहे. शास्त्र, गणित, व्याकरण, भूगोल इ. विषयांचे बरचसे अध्यापन उद्गामी पद्धतीने करणे इष्ट असते.

(२) अवगामी पाठ : सामान्यवरून विशिष्ठाचे ज्ञान मिळविणे व समस्यांची उकल करणे म्हणजे अवगामी पाठ. हवामानाची तत्त्वे, भूमितीतील प्रमेये इ. शिकवल्यानंतर त्यांवरील उदाहरणे सोडवावयास सांगणे, ही अवगामी पाठाची उदाहरणे होत.


(३) समालोचन पाठ : या पाठाचा हेतू मिळालेल्या ज्ञानाची उजळणी व व्यवस्थापन नव्या दृष्टिकोनातून करणे हा असतो. त्यासाठी तुलना, वर्गीकरण, मूल्यमापन इ. प्रक्रियांचा उपयोग करता येतो. समालोचनाचे कार्य विद्यार्थ्यांवर सोपविल्यास त्यांस स्वावलंबनाची सवय लागते आणि विषयात नवी गोडी निर्माण होते.

(४) आवृत्तिपाठ : नवसंपादित ज्ञान व कौशल्य कायम राहण्यासाठी त्यांची पुनरावृत्ती करणे जरूर असते. त्या दृष्टीने आवृत्तिपाठ उपयुक्त ठरतो. अशा पाठात सारखेपणामुळे येणारी नीरसता शिक्षक आपल्या कल्पकतेने टाळू शकतो. एखाद्या धड्यातील आशयाचे कथन करून घेणे, तत्संबंधी एखादे पत्र लिहावयास सांगणे अथवा त्याचे नाट्यीकरण करणे इ. प्रकारेही आवृत्तिपाठ घेता येतो.


(५) रसग्रहणात्मक पाठ : निसर्गाचे, ललित कलाकृतीचे व साहित्यकृतीचे सौंदर्य प्रतीत करून देणे व सौंदर्याभिरुची निर्माण करणे ह्या हेतूने दिलेला पाठ म्हणजे रसग्रहणात्मक पाठ होय. प्रत्यक्षात काव्य अथवा काव्यमय गद्य यांपुरताच रसग्रहणात्मक पाठ घेतला गेला, तरी चित्रकला, संगीत व मूर्तिकला यांसंबंधीही रसग्रहणात्मक पाठ घेता येतात.

अध्यापनाच्या युक्त्या (तंत्रे) : 

प्रश्न : प्राचीन काळापासून प्रश्नांचा उपयोग, विद्यार्थ्यास काय माहीत आहे, ते समजून घेण्यासाठी चालू आहे. पण प्रश्नांची रचना करणे सुलभ नसते. प्रश्न सोपा, सुटसुटीत, मुद्देसूद, नि:संदिग्ध व विचारप्रवर्तक असावा लागतो. कार्यकारणभाव शोधावयास लागणारे प्रश्न, परिणामशोधक प्रश्न व तुलना करावयास सांगणारे प्रश्न विचारप्रवर्तक असतात. त्यांचा उपयोग प्रतिपादन-टप्प्यात होतो. माहितीपर प्रश्नांचा उपयोग प्रस्तावनेत आणि परीक्षक प्रश्नांचा उपयोग उपयोजनात होतो.

कथन : कथन या अध्यापनयुक्तीचे महत्त्व फार आहे. गोष्टी मुलांना मनापासून आवडतात. भाषा, इतिहास या विषयांत कथनकौशल्याला महत्त्व असते. कथनाचा सर्वांत महत्वाचा गुण समरसता होय. निर्विकारपणे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हलू न देता केलेले कथन नीरस ठरते. कथनाची भाषा सोपी, नि:संदग्धि व समर्पक असावी. लहान मुलांना सांगावयाच्या कथांत शब्दांची व कल्पनांची पुनरुक्ती असावी. उचित हावभावांची जोड दिल्याने कथन परिणामकारक होते. आवाजात योग्य चढउतार करण्यानेही कथनात रंग भरतो.

शब्दिक दाखले : अध्यापकाला पुष्कळदा अमूर्त कल्पनांचे स्पष्टीकरण करावे लागते. त्यासाठी शाब्दिक दाखले, दृष्टांत, उदाहरणे इत्यादींचा उपयोग होतो.

देखरेखीखालील अभ्यास : अशा अभ्यासाचे दोन हेतू असतात : 

(१) मुलांना स्वावलंबनाची सवय लागावी व 
(२) मुलांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे. हल्ली नित्याच्या वेळापत्रकात किंवा त्यानंतरही अशा अभ्यासासाठी तास ठेवण्याची पद्धत रूढ होत आहे. देखरेख करणारा शिक्षक दक्ष व उत्साही असणे इष्ट असते.

अध्यापनाची साधने : 

(अ) आवश्यकता :
               अध्ययन सार्थ व सुस्पष्ट करण्यासाठी साधनांची मदत होते. साधने विवेचनीय विषयाला मूर्त रूप देतात व त्यामुळे ज्ञानग्रहण सुलभ होते. दोन अधिक दोन बरोबर चार या कल्पनेचा प्रत्यय मणी पुढे ठेवल्याने झटकन येतो. लहान मुलांना शिकवताना शक्य तितक्या इंद्रियांचे साहाय्य घ्यावे, हे तत्त्व सर्वसामान्य आहे. म्हणून माँटेसरी-पद्धतीत इंद्रियशिक्षणाची विविध साधने वापरतात. साधनांचा उपयोग अर्जित ज्ञान टिकवण्यासाठीही होतो. सचित्र कथेतील अधिक तपशील दीर्घतर कालावधीपर्यंत मुलांच्या ध्यानात राहतो. भौतिक शास्त्रांच्या अध्यापनात चलत्‌चित्रपटांचा उपयोग केल्यास विषयबोध चांगला होतो. साधनांचा आणखी एक उपयोग म्हणजे ज्ञानव्यवस्थापन हा होय. इतिहासातील एखाद्या कलखंडाचा अभ्यास संपल्यानंतर नकाशे व आलेख यांच्या साहाय्याने मिळविलेले ज्ञान सुव्यवस्थित व पक्के करता येते. अशा रीतीने साधनांच्या योगे ज्ञानग्रहण सुकर होत असले, तरी त्यांचा उपयोग विवकाने व उतरत्या भाजणीने करावयाचा असतो. प्राथमिक शाळेत सर्वच विषयांच्या अध्यापनात साधनांचा उपयोग आवश्यक असतो. माध्यमिक व उच्च शिक्षणात त्यांचा उपयोग कमी कमी होत जातो. साधनांचा उपयोग अमूर्त कल्पनांच्या द्वारा ज्ञानसाधना करण्याची शक्ती येईपर्यंतच करावयाचा असतो.


(आ) साधनांचे प्रकार : पाठ्यपुस्तक—हे अध्यापनाचे प्रमुख साधन होय [→पाठ्यपुस्तके]

              प्रत्यक्ष वस्तू—प्रत्यक्ष वस्तूंच्या द्वारा होणारे ज्ञान नि:संदिग्ध असते. प्राथमिक शाळेत निसर्गाभ्यासाठी फळे, फुले, वनस्पती इ. वर्गात प्रत्यक्ष आणता येतात. भूगोलाच्या अभ्यासात टेकडी, नदी, दरी इ. सहलीस नेऊन दाखविता येतात. रासायनशास्त्रातील गंधक व अन्य पदार्थ, विज्ञानातील तरफादी यंत्रे प्रत्यक्ष दाखविता येतात.


              प्रतिकृती—जेव्हा प्रत्यक्ष वस्तू आणणे शक्य नसते, तेव्हा तिची प्रतिकृती उपयोगी ठरते. वाफेच्या यंत्राचे कार्य प्रतिकृतीच्या द्वारा स्पष्ट होते. अनुक्रमश: होणाऱ्या यांत्रिक प्रक्रियांच्या स्पष्टीकरणासाठी प्रतिकृतीचा उपयोग आवश्यक असतो.

                चित्रे व तक्ते-चित्रांचा उपयोग अनेक विषयांच्या अध्यापनात होऊ शकतो. शब्दांचे व कृतीचे ज्ञान चित्राच्या साह्याने करून देता येते. तसेच लेखनाच्या अध्यापनातही चित्रांचा उपयोग चांगला होतो.

                   आकृत्या-गणित व भौतिक शास्त्रे यांच्या अध्यापनात आकृत्या आवश्यक असतात. शास्त्रीय प्रयोगातील विविध वस्तूंच्या मांडणीची आकृती काढता येणे, हे शास्त्राध्ययनाचे एक आवश्यक अंग होय.

                नकाशे-इतिहास व भूगोल यांच्या अध्यापनात अनेक प्रकारे नकाशांचा उपयोग होतो. उठावाचे नकाशे म्हणजे प्रतिकृतीचाच एक प्रकार होय. भूमीची उंचसखलता, पाण्याच्या प्रवाहाची दिशा इत्यादींसाठी त्यांचा उपयोग होतो.

           आलेख-आलेखांचा विशेष उपयोग भौगोलिक व आर्थिक विषयांत होतो. व्यापारी मंडळाच्या उत्पादनात व नफ्यातोट्यांत सालवार होणारे फरक आलेखांच्या द्वारा दाखवितात. भूगोलातील वार्षिक व महिनावार पर्जन्यमान व इतिहासातील घडामोडींचा कालानुक्रम इत्यादींसाठी आलेखांचा उपयोग होतो.

काही विशेष साधने : फळा-फळ्याचा उपयोग सर्व विषयांच्या अध्यापनात होतो. त्यासाठी चांगल्या हस्ताक्षराची व चित्र काढण्याच्या कसबाची गरज असते. फळ्याच्या बहुविध उपयुक्ततेमुळे त्यास शिक्षकाचा मित्र म्हणतात.

दृक्श्राव्य साधने : आधुनिक दृक्साधनांत चित्रदीप, अंतरोपरिद्रश, चित्रपट्टीप्रक्षेपक व चित्रक्षेपक यांचा समावेश होतो. या चार साधनांनी एकाच विषयावरील चित्रांची मालिका क्रमवार दाखविता येते. अशा चित्रमालिका इतिहास, भूगोल, भौतिक शास्त्रे इ. विषयांच्या अध्यापनात फार उद्धोधक ठरतात. त्यांपैकी पहिल्या तीन साधनांचा उपयोग करताना, मध्येच थांबून शिक्षकास योग्य ते स्पष्टीकरण करता येते. चलच्चित्रपटांत अधिक आकर्षकपणा असतो. ही साधने वापरली, तरी प्रक्षेपणपूर्व मार्गदर्शन व प्रक्षेपणापणोत्तर चर्चा आवश्यक असतात व त्यांसाठी शिक्षकास योजना व पूर्वतयारी करावी लागते. अन्यथा ही साधने केवळ करमणूक करतात व अध्यापनाचे उद्दिष्ट सफल होत नाही. पाश्चात्य देशांत चलच्चित्रपट व तत्संबंद्ध बोधपुस्तिका तयार मिळतात. तिकडे या दृक्साधनांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होतो.

            आधुनिक श्राव्य साधनांत ग्रामोफोन, फीतमुद्रक व नभोवाणी यांचा समावेश होतो. ग्रामोफोन व फीतमुद्रकाचा उपयोग संगीतशिक्षणात विशेष होतो. ग्रामोफोन व फीतमुद्रक ही साधने भाषाशिक्षणासही फार उपयुक्त आहेत. परकी भाषा शिकविताना उच्चार, आघात इत्यादींचे प्रत्यक्ष शिक्षण तज्ञांची भाषणे ऐकवूनच देता येते. फीतमुद्रकाच्या द्वारा मुलांचे वाचन व भाषण मुद्रित करून त्यांस ऐकविता येते व अशा रीतीने त्यांस स्वत:च्या दोषांचे प्रत्यक्ष ज्ञान घडते. ठराविक कालांतराने अशी मुद्रिते करीत गेल्यास वाचनात व भाषणात होणारी सुधारणा दृष्टोत्पत्तीस येते.
हल्ली सर्व प्रगत देशांत नभोवाणीवरून खास शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येतात व या कार्यक्रमांतून सर्व शालेय विषयांचे शिक्षण होऊ शकते. आपल्या देशातही ही प्रथा सुरू झाली आहे. या कार्यक्रमांचा पूर्ण फायदा होण्यासाठी श्रवणपूर्ण मार्गदर्शन व श्रवणोत्तर चर्चा यांची जरूरी असते. शिवाय नभोवाणीच्या कार्यक्रमाची वेळ ठरलेली असते. तो कार्यक्रम ऐकविण्यासाठी वेळापत्रकात बदल करावा लागतो. नभोवाणीवरील कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून जरूर त्या वेळी त्याचा फायदा घेता येतो.

              बोलपट, दूरचित्रवाणी व संगणक ही अत्याधुनिक साधने होत. बोलपटांना, विशेषत: माहितीपटांना व अनुबोधपटांना, शैक्षणिक दृष्टीने महत्त्व आहे. विशेषत: भूगोल व विज्ञान यांच्या अध्यापनात बोलपट उपयुक्त ठरतात. प्रगत देशांत शालेय शिक्षणासाठी दूरचित्रवाणीचा उपयोग केला जात आहे. पाश्चमात्य देशांत अध्यापनासाठी अध्यापनयंत्रांचाही आता उपयोग होऊ लागला आहे. त्यातून क्रमान्वित अध्यापनाचे तंत्र निर्माण झाले आहे.

                      आधुनिक विचारप्रवाह असा आहे, की नभोवाणी, बोलपट व दूरचित्रवाणी यांच्या साहाय्याने तज्ञ शिक्षकांकडून दूरदूरच्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी एकसमयावच्छेदे ज्ञानदान करता येते व म्हणून या साधनांचा उपयोग करून शिक्षकांचे श्रम व वेळ वाचवावीत आणि त्यांना अधिक महत्त्वाचे सूचनात्मक विचारप्रवर्तन करण्यास मोकळे करावे. असे केल्याने शिक्षणसंस्थांतील वाढत्या विद्यार्थी संख्येची व शिक्षकांच्या तुटीची समस्या सुटेल. अधिक गुणवान व कार्यक्षम शिक्षक नेमणे शक्य होईल, त्यांना विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देणेही शक्य होईल व याचा परिणाम शिक्षणाचा कस सुधारण्यात होईल.

वस्तुसंग्रहालये व कलासंग्रहालये : या दोन्ही संग्रहालयांचा उपयोग वाढत्या प्रमाणात करण्याची प्रवृत्ती प्रगत देशांत आढळते. वस्तुसंग्रहालयांचा उपयोग सांस्कृतिक ज्ञानबोधासाठी व कलासंग्रहालयांचा उपयोग सौंदर्यप्रतीती घडविण्यासाठी होतो. बहुतेक देशांतील, विशेषत: भारतातील, शालेय शिक्षणातील एक उणीव अशी आहे, की त्यातून सौंदर्यशोधक व सौंदर्यास्वादक दृष्टी निर्माण होत नाही. कलासंग्रहालयांशी मुलांचा परिचय वाढविल्याने ही दृष्टी निर्माण होईल व त्यांचे जीवन अधिक समृद्ध होण्यास मदत होईल.

                विशिष्ट विषयांचे अध्यापन व अध्यापनपद्धती : अध्यापनाच्या उद्दिष्टांनुसार अध्यापनपद्धतीतही फरक आढळतो. मातृभाषेच्या अध्यापनात आधी लेखनवाचनादी गोष्टी निरीक्षण-अनुकरणपद्धतीने शिकविल्यानंतर, प्रमुख उद्दिष्ट विचारशक्तीचा विकास करणे हे असते. त्यासाठी समस्यानिष्ठ पद्धतीचा अवलंब करावा लागतो. उलट परभाषांच्या अध्यापनात निरीक्षण-अनुकरण पद्धतीचाच उपयोग होतो. कारण त्याचे उद्दिष्ट परकीय भाषा आत्मसात करणे हे असते. गणितात गणनकौशल्याच्या अध्यापनासाठी परिपाठपद्धतीचा अवलंब करावा लागतो. अंक ही अमूर्त कल्पना पटविण्यासाठी मूर्ताकडून अमूर्ताकडे जावे लागते व समस्या-उकलनाचा महत्त्वाचा भाग समस्यानिष्ठ पद्धतीने शिकवावा लागतो. इतिहासाच्या अध्यापनात मुलांना सत्यान्वेषण करता यावे म्हणून संशोधनपद्धती वापरतात. नैतिक मूल्ये बिंबविण्यासाठी अनुमानपद्धतीचा वापर करतात. भूगोलाच्या अध्यापनात निसर्गाचा मानवी जीवनावरील प्रभाव स्पष्ट करण्यासाठी निरीक्षण-अनुमान-पद्धती उपयोगी पडते. विज्ञान शिकविण्याचे उद्दिष्ट भौतिक घटनांतील कार्यकारणभाव समजावा हे असल्यामुळे, त्या विषयाच्या अध्यापनात विशिष्टाकडून सामान्याकडे जाणाऱ्या उद्गामी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. कलांच्या अध्यापनात सौंदर्यप्रतीती व्हावी न सौंदर्यनिर्माणशक्ती विकसित व्हावी हा हेतू असतो. यासाठी निरीक्षण, तुलना, समालोचन, अनुकरण इ. प्रतिक्रियांचा उपयोग करावा लागतो. सर्व शालेय विषयांच्या अध्यापनात ज्ञानग्रहण हे उद्दिष्ट असल्यामुळे ज्ञानदानासाठी कथनाचा व ज्ञान पक्के करण्यासाठी परिपाठांचा अवलंब करावा लागतो.

काही संकीर्ण प्रश्न : (अ) वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण : आधुनिक मानसशास्त्रातील संशोधनानुसार सर्व मुलांना ज्ञानाचे ग्रहण सारख्याच गतीने करता येत नाही; म्हणून वर्गशिक्षणाची पद्धती त्याज्य असा विचारप्रवाह सुरू झाला. इंग्रज शिक्षणतज्ञ बॅलर्ड याने वर्गशिक्षण कालच्युत ठरविले. पण व्यक्तिगत शिक्षण' कितीही स्पृहणीय असले, तरी व्यवहार्य नाही. सर्वच देशांतील वाढती विद्यार्थीसंख्या लक्षात घेता व्यक्तिगत शिक्षणासाठी शिक्षक पुरविणे अशक्य आहे. शिवाय मानसशास्त्रज्ञांच्या मते इतिहास, वाङ्‌मय यांसारखे स्फूर्तिप्रद विषय शिकविण्यासाठी मोठे वर्ग असणे आवश्यक असते. भावनासंक्रमणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी समूह लागतो. समाजशास्त्रदृष्टया वर्ग शिक्षणाचे वा सामूहिक शिक्षणाचे काही फायदे आहेतच. म्हणून वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण यांमधील सवर्णमध्य साधण्यासाठी प्रवृत्ती निर्माण झाली. यासाठी वर्गातील विद्यार्थीसंख्या मर्यादित करणे हा एक उपाय होय. अशी मर्यादा घातल्याने वर्गशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण दोन्ही साधतात. हा उपाय आर्थिक टंचाई असलेल्या विकासनशील देशांत शक्य होत नाही. दुसरा पर्याय म्हणजे वर्ग मोठा ठेवून त्याचे व्यक्तिभेदाप्रमाणे गट पाडणे, व्यक्तिभेदास अनुसरून स्वाध्याय व गृहपाठ देणे व मुलांस नेतृत्व देऊन त्यांचे साह्य घेणे हा होय. हा पर्यायही फारसा व्यवहार्य नाही. शिक्षणाचा दर्जा खालावण्यास वर्गातील वाढती संख्या अंशत: जबाबदार आहे. पण ही संख्या कमी करण्यासाठी जास्त शिक्षक नेमणे आर्थिक टंचाईमुळे व शिक्षकांच्या दुर्मिळतेमुळे शक्य होत नाही. तांत्रिक साधनांच्या साहाय्याने काही उणिवा दूर करण्याची धडपड अनेक देशांत सुरू आहे.

(आ) शिक्षक-विद्यार्थी-सहकार्य : खऱ्या शिक्षणासाठी शिक्षक-विद्यार्थी-संबंध जिव्हाळ्याचे असावे लागतात. सहकार्यासाठी उद्दिष्टांची एकवाक्यता आवश्यक असते. विद्यार्थ्याला शिकण्याची आच असेल व शिक्षकाला शिकविण्याची तळमळ असेल, तर दोघे एकोप्याने काम करतील. शिक्षक-विद्यार्थी-विसंवादाचे मूळ शिक्षणविषयक अपसमजात आहे. शिक्षण म्हणजे प्रभावी व्यक्तीने संस्कारक्षम व्यक्तीला लावलेले वळण, ही जाणीव समाजात निर्माण झाल्यास शिक्षणकार्य व्यवस्थितपणे चालेल. या जाणिवेतूनच शिक्षक-विद्यार्थीमधील विसंवाद नष्ट होईल. त्यासाठी शिक्षक-पालक-सहकार्याचीही गरज आहे.


(इ) शिस्त आणि शिक्षा : अध्यापन यशस्वी व्हावयाचे असेल, तर वर्गात सुव्यवस्था व शिस्त पाहिजे. त्यासाठी अध्यापनकौशल्यही इष्ट असते. शिस्तीसंबंधीच्या कल्पना आता बदलल्या आहेत. विद्यार्थ्यांनी निमूट बसणे व शिक्षकाने बोलत राहणे, ही शिस्तीची कल्पना मागे पडली आहे. विद्यार्थी पाठात सहभागी होतात, अध्यापनात रुची दाखवितात व ज्ञानग्रहणाला पोषक वातावरण राखतात, म्हणजे शिस्त होय. ती शिक्षेच्या भीतीतून निर्माण न होता विद्यार्थ्याच्या जबाबदारीच्या जाणिवेतून निर्माण व्हावी व ती स्वयंशिस्त असावी.


               मानसशास्त्रीय दृष्टीने विद्यार्थांच्या उच्छृंखल, गैरशिस्त व आळशी वर्तनाची कारणे त्यांच्या संगोपनात व संस्कारांत आढळतात. ती कारणे दूर करण्याच्या प्रयत्न करणे योग्य ठरते. काही प्रसंगी शिक्षा करणे अनिवार्य ठरते; पण शिक्षेमुळे आपल्यावर अन्याय झाला असे विद्यार्थ्यास वाटले, तर त्यात सुधारणा होणार नाही. शिवाय अध्यापनाला प्रेरणा शिक्षेच्या भितीतून मिळत नाही व मिळणे इष्ट नसते. प्रौढ विद्यार्थ्यांच्या बाबतीत क्वचित कानउघाडणी करून, तर कधी त्यांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना अध्ययनाला प्रवृत्त करता येते.

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

TET Examination 2014-15

 

TET साठी अतिशय महत्वाचे


 विकासात्मक मानसशास्त्र : 

संपूर्ण जीवनात−गर्भाव्यवस्थेपासून मृत्यूपर्यंत−माणसामध्ये घडून येणाऱ्या शारीरिक-मानसिक व समग्र संघटनात्मक बदलांची यथातथ्य नोंद घेऊन त्यांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करणारी ज्ञानशाखा. मानसशास्त्राच्या आधुनिक स्वरूपातील एक शाखा म्हणून विकासात्मक मानसशास्त्राला सु. शंभर वर्षाचा इतिहास आहे. त्यापूर्वीही माणसाला आयुष्यातील विकास गतीची, ऱ्हासाची, त्यातील अटळपणाची जाणीव होतीच. भारतीय आणि पाश्चिमात्य विचारांत अनेक ठिकाणी बाल, कुमार, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशा कालखंडांत मनुष्य कसा वागत असतो याची काही निरिक्षणे आणि निष्कर्ष आढळून येतात. रूसो (१७१२−७८), पेस्टालोत्सी (१७४६−१८२७), टीडेमान (१७४८−१८०३) हे अठराव्या शतकातील, तर प्रिअर (१८४१−९७) हे एकोणिसाव्या शतकातील अभ्यासक बालमनाच्या विकासाबद्दल काही संकल्पना मांडत होते; परंतु ⇨ग्रॅन्‌व्हिल स्टॅन्ली हॉल(१८४४−१९२४) यांचा पौगंडावस्थेचा किंवा ⇨किशोरावस्थेचा अभ्यास हाच या शास्त्राच्या आजच्या स्वरूपाचा आरंभबिंदू मानला जातो. ‘बालमानसशास्त्र’ म्हणून बालपणाचा अभ्यास करण्यापाशी हा विषय मर्यादित न करता एकूणच मानवी आयुष्यात घडणारे बदल हाच अभ्यासविषय घेऊन त्याविषयीचे सिद्धांत या शास्त्रात मांडले जातात.
                 ग्रॅन्‌व्हिल स्टॅन्ली हॉल यांनी विकासात्मक अभ्यासाची शास्त्रीय पद्धती बसवली, म्हणून त्यांच्याकडे या शाखेच्या जनकत्वाचा मान जातो. त्यांच्यानंतर ⇨आल्फ्रेड बीने (१८५७−१९११) यांनी मापनपद्धतीचा, ⇨सिग्मंड फ्रॉइड (१८५६−१९३९) ह्यांनी मनोविश्लेषणपद्धतीचा, तर पव्हलॉव्ह (१८४९−१९३६), जे. बी. वॉटसन (१८७८−१९५८), स्किनर (१९०४-९०) यांनी प्रायोगिक पद्धतीचा विकास केला. अभ्यास करताना आवश्यक असलेली वस्तुनिष्ठ तथ्ये कोणत्या स्वरूपाची असावीत याचा पाया त्यामुळे घातला गेला. ⇨ मारिया माँटेसरी (१८७०-१९५२), ⇨झां प्याजे(१८९३−१९८०) यांनी विकासप्रक्रियेतील वैशिष्ट्यपूर्ण घटकांची नोंद करून बालकेंद्री दृष्टीकोन आकारास आणला. नंतरच्या काळात झालेले संशोधन या वैचारिक व्यवस्थांवरच आधारून पुढे गेले.
                    वर म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जीवनात−म्हणजे गर्भावस्थेतून मृत्यूपर्यंत−माणसामध्ये जे शारीरिक मानसिक व समग्र संघटनात्मक बदल घडतात त्यांची यथातथ्य नोंद आणि अन्वय लावण्याचा प्रयत्न करणारी ही ज्ञानशाखा आहे. आजवरच्या संशोधकांनी विशिष्ट वयोगट, विशिष्ट पैलू आणि विशिष्ट उद्देश धरून आपापले अभ्यास सादर केले आहेत. या सर्वांचा एकत्र विचार करून संपूर्ण जीवनास लागू पडेल असे सूत्र हाती लागू शकेल असे अभ्यासकांना वाटते. त्याचप्रमाणे एखादे सूत्र सिद्धांतकल्पना म्हणून वापरून त्याचा पडताळा घेत राहणे ही देखील एक दिशा संशोधकांना उपलब्ध आहे. अशा अभ्यासातून काही उपायोजनक्षेत्रे सूचित होतात. उदा., भाषिक विकास हा विषय वेगवेगळ्या जीवितसंदर्भात समजावून घेऊन भाषांचे अध्ययन-अध्यापन सुलभ होऊ शकेल, त्याचप्रमाणे एखाद्या घटिताचा दीर्घकालीन परिणाम तपासता येईल किंवा स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचा विचारही शास्त्रीय माहितीच्या संदर्भात करता येईल.

उद्दिष्टे व पद्धती : 
              विकासात्मक मानसशास्त्राची उद्दिष्टे वर उल्लेख केलेल्या काही साध्यांशी निगडित आहेत : (१) माहिती उपलब्ध करणे. यात खालील प्रकारच्या अभ्यासाचा समावेश होतो :
(अ) वयपरत्वे आढळून येणारे सर्वसामान्य बदल नोंदविणे.
(ब) विशिष्ट वयोगट व विशिष्ट परिसरातील घटक यांच्या संदर्भासहीत नोंदी करणे.
(क) वयपरत्वे आढळणारे बदल विकासाच्या विविध पैलूंच्या मर्यादेत नोंदणे.
(२) अन्वय व सिद्धांतनिर्मिती. या अंतर्गत पुढील उद्दिष्टे येतात :
(अ) माहितीचे विवरण करून निष्कर्ष काढणे.
(ब) वर्तनबदलाची कारणमीमांसा करणे.
(क) सहसंबंध आणि पूर्वकथनाची शक्यता अजमावणे.
(ड) कोणताही फरक व्यक्तिविशिष्ट आहे, की सर्वसाधारण गुणविशेष आहे हे ठरविणे इत्यादी.
                   या उद्दिष्टांना अनुलक्षून संशोधनातील प्राथमिक तथ्ये ठरतात. त्यांचे स्वरूप, नोंद आणि शक्य असेल त्या सर्व ठिकाणी वस्तुनिष्ठ मापनपद्धतीचा वापर करून ही तथ्ये प्राप्त केली जातात. तुलनात्मक किंवा व्यक्तिभेदात्मक असे या नोंदीचे स्वरूप असते. संशोधन−प्रकल्प ठरविताना संबंधित व्यक्तींच्या वर्तनाचे स्वरूप, महत्त्व, त्यातील वयपरत्त्वे अपेक्षित बदल, प्रत्यक्ष निरीक्षणाची कार्यवाही करण्याची रूपरेषा−म्हणजेच कोण, केव्हा, कोठे, कसे व कशाचे निरीक्षण करणार याचा निश्चित आराखडा−सर्व गोष्टी स्पष्ट कराव्या लागतात. निरीक्षणासाठी ज्या व्यक्तींचे निरीक्षण करावयाचे, त्यांची नोंद त्यांच्या नैसर्गिक संदर्भात, विशिष्ट परिस्थितीत किंवा विशिष्ट प्रायोगिक रीत्या नियंत्रित परिसिथितीत करता येते. प्रत्यक्ष निरीक्षण, माहीतगार व्यक्तीकडून माहिती गोळा करणे, प्रश्नावलींचा वापर करणे, चाचण्या घेणे, मुलाखती घेणे इ. तंत्रे वापरता येतात. तथ्ये गोळा करणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये व संख्या यांचाही परिणाम होऊन तथ्ये बिघडू नयेत याची काळजी घ्यावी लागते. संख्याशास्त्रीय विवरण आणि त्या दृष्टीने आकडेवारीचे स्वरूप यांचीही पूर्वनियोजित व्यवस्था करावी लागते.
               एकूणच वैज्ञानिक पद्धतीचे, विश्वसनीयतेचे आणि यथार्थतेचे निकष वापरून अभ्यासपद्धती ठरविल्या जातात.
विकासात्मक अभ्यासाचे कालखंड : मानवी आयुष्यात होणारे बदल नेमकेपणाने अभ्यासता यावेत म्हणून मानवी आयुष्याची एकूण अकरा कालखंडात विभागणी केली जाते. जीवन जरी सलग असले, तरी अभ्यासाच्या सोयासाठी आणि काही खास वैशिष्ट्यांना धरून हे कालखंड मानले जातात :
(१) प्रसूतिपूर्व कालखंड : गर्भधारणेपासून जन्मापर्यंत.
(२) अर्भकावस्था : जन्मापासून दोन आठवडे.
(३) शैशवावस्था : वय दोन आठवडे ते २ वर्षे.
(४) बाल्यावस्था : पूर्वकाल: वय २ ते ६ वर्षे.
(५) बाल्यावस्था : उत्तरकाल: वय १० ते १० वर्षे.
(६) किशोरावस्था : वय १० ते १३−१४ वर्षे.
(७) कुमारावस्था : पूर्वकाल वय १३−१४ ते १८ वर्षे.
(८) कुमारावस्था : उत्तरकाल : वय १८ ते २१ वर्षे.
(९) तारुण्यावस्था : वय २१ ते ४० वर्षे.
(१०) प्रौढावस्था : वय ४० ते ६० वर्षे.
(११) वृद्धावस्था : ६० वर्षे वयानंतरचा काळ.
                         या प्रत्येक कालखंडाचे बारकाईने अभ्यास करणारे विशेतज्ञ आहेत. मानवी विकास ही इतर सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाचाही विषय असलेली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या शाखेच्या अन्य शाखांतील अभ्यासाशी जवळून संबंध पोचतो.
                        भारतातील संशोधनकार्य : आधुनिक विज्ञानाचा भारतीय विचारात प्रवेश इंग्रजी शिक्षणामार्फत झाला. त्यामुळे इंग्रजी शिक्षणातून घडलेल्या संशोधकांना एका परकीय प्रेरणेतून परकीय संकल्पनांना दुजोरा देण्याचे, पडताळा पाहण्याचे दुय्यम कामच दीर्घकाळ करावे लागले. तरीही येथील बालविकासाच्या आणि बालशिक्षणाच्या प्रश्नांना थेटपणे सामोऱ्या जाणाऱ्या व्यक्ती होत्याच. त्यांत ⇨गिजुभाई बधेका (१८८५−१९३९), जुगतराम दवे, ⇨ताराबाई मोडक (१८९२−१९७३) ही नावे अग्रेसर होत. त्यांनी केलेली निरीक्षणे त्यांच्या अंगीकृत कार्याच्या उद्दिष्टांना धरून होती. एका अभ्यासशास्त्र विकसित करण्याचा विद्यापीठीय दृष्टीकोण त्यात नव्हता. परंतु त्यांच्यापर्यंत मारिया माँटेसरीचे विचार व कार्य पोचलेले होते. आधुनिक विज्ञानाच्या विश्लेषक आणि घटलक्षी दृष्टीकोणापेक्षा एक वेगळा समग्रलक्षी विचार भारतीय परंपरेत होता. तो जनरीतींमध्ये काही प्रमाणात साचून पडला होता आणि परंपरेच्या अभ्यासाचे तेज मंद राहिले होते. भारतीय संदर्भात पुढे रेटणारी अभ्यासकांची फळी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील संशोधन हेच भारतीय विचारांचे आजचे केंद्र म्हटले पाहिजे. या दृष्टीने १९३० मध्ये म्हैसूर विद्यापीठातील व्ही. वेंकटाचार यांनी एम्. ए. पदवीसाठी सादर केलेला, जन्मापासून एक वर्ष या कालखंडातील विकासाचा अहवाल हा आरंभ म्हणावा लागेल. त्याला आर्नल्ड गेझेल यांच्या विकासमापनाचा आधार व संदर्भ होता. त्यानंतर १९६०स पर्यंत झालेले अभ्यास वेगवेगळ्या ज्ञानशाखंतील व्यक्तिगत संशोधनाच्या स्वरूपात आढळतात. परंतु त्यातून एखादा भारतीय दृष्टीकोन विकसित झाल्याचे दिसत नाही.
                           एन्‌सीइआर्‌टीच्या (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महामंडळ) पूर्व प्राथमिक शिक्षण विभागातून डॉ. राजलक्ष्मी मुरलीधरन् ह्यांच्या नेतृत्त्वाखाली एक राष्ट्रव्यापी संशोधन योजना १९६२ च्या सुमारास हाती घेण्यात आली. त्या योजनेत अडीच ते पाच वर्षे वयातील मुलांच्या विकासात्मक वर्तनाची नोंद करण्यात आली. हे काम अहमदाबाद, अलाहाबाद, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद आणि मद्रास ह्या केंद्रात झाले. एकूण ६,९९७ मुलांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. यांत शहरी, औद्योगिक व ग्रामीण अशा तीन प्रकारच्या वातावरणातील मुले निवडली होती. खेळ, दैनंदिन व्यवहार, खाणे-पिणे, कपडे घालणे, संपर्क-व्यवहार इ. वर्तनाचा अभ्यासात समावेश होता. १९६८ च्या सुमारास ह्या संशोधनाचे अहवाल तयार होऊ लागले. परंतु त्यांतून भारतीय मुलांच्या ह्या कालखंडातील विकासाचे निश्चित स्वरूप आकारलेले दिसत नाही किंवा त्यासाठी पाठपुरावा झालेला आढळत नाही.
                            बडोद्याला महाराजा सयाजीराव विद्यापीठात बालविकास व कौटुंबिक संबंध विभागाने पहिल्या तीस महिन्यातील कारक व मानसिक विकास या विषयांवरील संशोधनास १९६४ मध्ये आरंभ केला. तो अहवाल एक महत्त्वाचा टप्पा होय. परंतु अद्यापही भारतीय अभ्यास अलग अलगच बघावे लागतात. त्यांतून सैद्धांतिक दिशा निर्माण झाल्याचे दिसत नाही.
                          विकासात्मक मानसशास्त्रीय उपपत्ती : सतराव्या शतकात ⇨जॉन लॉक (१६३२−१७०४) यांनी यूरोपीय विचारामध्ये मूल म्हणजे प्रौढ माणसाची छोटी प्रतिकृती नव्हे, हे निरीक्षण स्पष्टपणे मांडले. मुलांचे मन ही एक कोरी पाटी आहे, त्यावर अनुभवाचे संस्कार व आघात होऊन मन आकारास येते. साहचर्य, पुनरावृत्ती, अनुकरण आणि वर्तनपरिणाम या प्रक्रियांमुळे मनाचे रूप विकसित होते; मूल शिकते असे त्यांनी म्हटले. अठराव्या शतकात रूसो यांच्या मांडणीमध्ये मूल एका निसर्गनियतक्रमाने विकसित होते, हा मुद्दा महत्त्वाचा होता. मुलांचे बघणे, विचार करणे, भावना हे सर्व प्रौढांपेक्षा वेगळे असते आणि ० ते २ वर्षे, १२ ते १५ वर्षे आणि १५ ते २१ वर्षे अशा चार टप्प्यांत त्यांचा विकास होतो, अशी त्यांची मांडणी होती.
                         चार्ल्स डार्विन ह्यांच्या उत्क्रांतिवादी विचारसरणीमुळे मानवी विकासाला प्राणिजातीच्या विकासाचा व्यापक संदर्भ मिळाला. त्यातून मानवाचे अन्य प्राणिजातींशी असलेले जैविक साम्य पुढे आले. त्याचप्रमाणे कोणत्या जैविक बदलांमुळे मानव अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे जीवन प्राप्त करून घेऊ शकतो, याचाही अभ्यास सुरू झाला.
                         अनुवंश आणि परिपक्वन : बालविकासाचा नैसर्गिक आराखडा अनुवंशाने मिळतो आणि विकास पूर्णत्वास नेणाऱ्या नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे परिपक्वन. मुलाचे प्रतिपालन करणारे कुणीतरी असले, म्हणजे परिपक्वनाने होणारा किमान बदल प्रत्येक व्यक्तीत होतो. ग्रॅन्व्हिल स्टॅन्ली हॉल, लुई टर्मन यांनी या बदलांचा मागोवा घेऊन बौद्धिक क्षमतांमधील अनुवंशाचे कार्य स्पष्ट करण्यास सुरुवात केली. हॉल यांचा कुमारवयाचा अभ्यास आणि टर्मन यांचा बौद्धिक क्षमतांबद्दलचा दीर्घकालीन अभ्यास म्हणजे वैकासिक पद्धतीसाठी लागणाऱ्या चिकाटीचे व दीर्घोद्योगाचे वस्तुपाठच आहेत. आर्नल्ड गेझेल यांनी विकासाचे टप्पे आणि त्यांतील विविध पैलूंचा विकासक्रम निश्चित करण्याचे कार्य केले.
                           परिसर आणि अध्ययन : मानवी विकासाचे निर्णायक नियंत्रण अनुवंशाने होते, की परिस्थितीने होते हा वाद बराच काळ चालू होता. त्यातील पुरावे व तथ्ये मांडण्याची गरज संशोधन पुढे नेण्यास उपयुक्त ठरली. ⇨वर्तनवाद या नावाने ओळखली जाणारी मानसशास्त्रातील सैद्धांतिक भूमिका याही क्षेत्रात विकासातील अध्ययनाचे व परिसराचे महत्त्व विशद करून सांगते. अध्ययन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया कोणती? त्यात विकासक्रम कसा दिसतो ? अध्ययनाचे नियामक घटक कोणते? यांसारखे प्रश्न प्रयोगशाळेत सोडवण्याची पद्धती आणि परिसरांचे महत्त्व दाखवणारी निरीक्षणे यांचे मोठेच योगदान या सैद्धांतिकांनी दिले. जे. बी. वॉटसन, बी. एफ्. स्किनर, बांडुरा, मिलर, डोलार्ड इ. अमेरिकन शास्त्रज्ञ, तसेच पाव्हलॉव्ह आणि त्यांचे सहकारी यांचा एक मुद्दा असा होता, की अध्ययनाचे निश्चित नियम प्रस्थापित करता येत असल्यामुळे बदलाचे पूर्वनियोजित नियंत्रणही शक्य आहे.
                          नैसर्गिक आचार व समायोजन : चार्ल्स डार्विन यांच्या समग्र मांडणीने प्रभावित झालेला हा विचार आहे. मानवी देहरचना आणि त्यांतील कार्यपद्धती निसर्गदत्त आहेत. परिसराशी समायोजन करताना त्यातील परिसराशी समायोजन करताना त्यांतील काही शक्यतांचा आविष्कार होत असतो. त्यानुसार प्राणिवर्तनात काही साचे किंवा संघात (पॅटर्न्स) तयार होतात. विकास म्हणजे या संघातांतील बदल. या बदलाची दिशा जीवकलहात टिकून राहण्याची क्षमता वाढण्याच्या बाजूला नेते. हे नैसर्गिक आचाराचे तत्त्व होय. जीवरक्षण व वंशसातत्य ही त्यामधील नैसर्गिक उद्दिष्टे होत.
                         मानवी बालकाचा परिपक्वनाचा काळ बारच दीर्घ मुदतीचा असतो. त्यामुळे परिसर नियंत्रित करून फक्त नैसर्गिक स्थितिगतीचा अभ्यास करणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे या काळात प्रारंभीचा काळ अवलंबित्वाचा असल्याने पालन करणाऱ्या व्यक्तीचा संबंध अटळ ठरतो. हे कार्य माता किंवा तिची जागा घेणारी व्यक्ती करते. हा मूलभूत संबंध माणसाला लळा लावणारा आणि ताटातूट झाल्यास भावनिक दृष्ट्या आर्त बनवणारा असतो. या दोन्हीचे परिणाम डॉ. जे. बोलबी यांनी अभ्यासले. त्यामधून पहिल्य वर्षातील स्थिर भावबंधांचे महत्त्व स्पष्ट झाले, त्याचप्रमाणे ताटातुटीचे आघात कसे परिणाम घडवतात, तेही लक्षात आले.
                           जे. ब्रूनर यांनी केलेला अध्ययनशीलतेचा अभ्यास : यात मानवी समायोजनातील लवचीकता, उपयुक्त आणि अनुपयुक्त वर्तन, सहेतुक आणि अहेतुक वर्तन त्याचप्रमाणे जिज्ञासेचे जैविक महत्त्व इ. विषय पुढे आले. झां प्याजे यांचे नाव विकासात्मक मानसशास्त्रज्ञ विशेष अन्वर्थक आहे. व्यक्तीचा विकास होताना आत्मभान व परिस्थितीवर नियंत्रण यांचा विचार करून त्यांनी वैकासिक अवस्थांचा सिद्धांत मांडला. ज्ञानक्रियेची मानसिक पाळेमुळे कशी घडतात, कारक आणि बौद्धिक सांधे कसे तयार होतात. त्यांतील संतुलन कसे निर्माण होते हे सर्व त्यांनी अभ्यासात समाविष्ट केले. मनोविश्लेषणवादी भूमिकेतून बालविकासाकडे पाहताना आंतरिक प्रेरणा आणि बाह्य जगातील वास्तव यांच्या आंतरक्रियेचा आलेख ‘मनोलैंगिक विकासाची रूपररेषा’ या स्वरूपात पुढे आला. हा आलेख फ्रॉइड यांनी काटेकोरपणे शारीरिक लैंगिकतेच्या वैशिष्ट्यांना धरून रेखाटला होता. त्यांच्यानंतर ⇨कार्ल गुस्टाफ युंग (१८७५−१९६१), ⇨ॲल्फ्रेड ॲड्लर (१८७०−१९३७) यांच्यापासून एरिक एरिकसन यांच्यापर्यंत अनेकांनी आत्मभानाचा, स्वत्वकल्पनेचा, अस्मितेचा विचार बहुघटकीय आणि सामाजिक संदर्भासहित केला. त्यात ‘स्व’ची घडण आणि ‘स्व’ चे योगदान या दोन्हींचा विचार अधिक विस्तृत व खोल होत गेला.
                             मानवलक्षी भूमिका : अब्राहम मॅस्लो यांनी माणसाचा विचार प्राण्यांच्या बरोबरीने करण्यापेक्षा मानवाला प्राप्त असलेल्या पातळीवरून करायला हवा, असे प्रतिपादन करून माणसाच्या विकासप्रक्रियेचे अवलंबित्वाकडून सक्षमतेकडे आणि सक्षमतेकडून उन्नयनाकडे असे सलग स्वरूप विशद केले. माणूस प्राणी असला, तरी फक्त प्राणी म्हणून त्याच्या विकासाकडे पाहणे पुरेसे नाही ही त्यांची भूमिका. मनुष्य स्वतःच्या बीजरूपाचा विकास साधण्यासाठी आतूनच क्रियाशील असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि गरजांची एक तार्किक उतरंड मांडली. ज्याप्रमाणे उणीव भरून काढण्यासाठी अनेक प्रेरणा कार्यान्वित होतात, त्याचप्रमाणे आत्मोन्नती, आत्मविष्कार किंवा विशेष मानसिक संपन्नता देणाऱ्या अनुभूतीसाठीही खास ‘मानवी’ प्रेरणा कार्यान्वित होतात. अशा प्रेरणांचा आविष्कार ज्या व्यक्तींमध्ये आढळतो त्यांचा मॅस्लो यांनी केलेला अभ्यास हा या सिद्धांताचा प्रमुख आधार होय. त्याला धरून मानवलक्षी मानसशास्त्र (ह्यूमॅनिटिक सायकॉलॉजी) अशा नावाने स्वतंत्र प्रणाली सुरू झाली.
                               विकासाची व्यवस्थात्मक संकल्पना : अगदी अलीकडे डोनाल्ड फोर्ड आणि रिचर्ड लर्नर यांनी विकासाची एक व्यवस्थात्मक संपल्पना सादर केली आहे. विकास म्हणजे टिकाऊ स्वरूपाचा गुणात्मक आणि विविधता वाढवणारा बदल, अशी व्याख्या करून या संपूर्ण बदलाच्या प्रक्रियेत सहभागी असणारी रचना व कार्य, त्यातील मर्यादा आणि शक्यता, त्याच्या दिशा व परिणत यांबद्दल त्यांनी काही उलगडा केला आहे.
                              विकासाच्या व्याख्येत त्यांनी अन्य वैशिष्ट्येही नमूद केली आहेत. विकास घडताना योजनाबद्ध, अनुक्रमिक, आनुवंशिक गुणांमधून झालेले आणि परिसराशी व्यक्तीची विशिष्ट आंतरक्रिया घडून प्रत्यक्षात येणारे असे विविध प्रकारचे बदल होत असतात. विकासाला दिशा असली, तरी त्याचा शेवट स्थिर किंवा नियोजित नसतो. त्या दिशाही वेगवेगळ्या असू शकतात, त्यात मूल्यभावाचा प्रश्न नाही. व्यक्तीचा स्वतःचा निर्णय पूर्वेतिहास बाजूला सारून बदल घडवून आणू शकतो. अशा बदलातून नव्या शक्यता व्यक्तीसमोर येतील व त्यांतून नवी निवड होऊ शकेल. यामुळे काही बाबतीत विकास निरंतर व विशिष्ट दिशेने घडेल, तर काही बाबतीत खंडित, अल्पकालीन राहील. या संकल्पनाव्यूहात भूतकाल व भविष्यकाल यांचे नाते सतत परिवर्तनशील राहू शकते, या गोष्टीला महत्त्व आहे. ज्या रचना आणि जे बंध विशिष्ट परिस्थितीत तयार होतात, त्यांत व्यक्ती स्वतःच्या प्रयत्नाने बदल घडवते हेही विकासाचे सुकाणू त्या त्या माणसाच्या हाती देणारे खास तत्त्व होय. एकविसाव्या शतकाकडे जातानाची ही स्वत्वधारणा म्हणता येईल.
भारतीय पारंपारिक विचार : या सर्व उपपत्ती आजच्या विकासात्मक मानसशास्त्राच्या प्रगतीस हातभार लावत आहेत. भारतीय परंपरेतील समग्रलक्षी विचार आज आधुनिक संकल्पनाव्यूहांमध्ये बसत नाही. परंतु त्यातील विचाराची तार्किक चौकट वापरून आधुनिक तंत्राने अभ्यास करणे शक्य आहे. आयुर्वेद माता−बालक संबंधाला महत्त्व देतो. बालकाचा विकास आणि संगोपनपद्धती यांतील नातेही त्यात सांगितले आहे, तसेच काही विधिनिषधेही सांगितले आहेत. सोळाव्या वर्षापर्यंत पाच टप्पे सांगितले आहेत. (१) गर्भावस्था, (२) क्षीरदावस्था : पहिले सहा महिने, (३) क्षीरान्नदावस्था : ६ महिने ते २ वर्षे, (४) बाल : २ ते ५ वर्षे, (५) कुमार : ५ ते १६ वर्षे. या प्रत्येक अवस्थांतराच्या सुमारास एकेक संस्कारविधी सांगितला आहे. प्राचीन भारतीयांच्या विचारपद्धतीत समग्रता आणि संघात यांच्या आकलनाला आणि सूक्ष्म भेदांना विशेष स्थान होत. समग्रलक्षी दृष्टिकोण (होलिस्टिक ॲप्रोच) आणि संघात-विश्लेषण (पॅटर्न अनॅलिसिस) या मार्गाने विचार केल्यास आज घटकलक्षी आणि विभाजननिष्ठ अभ्यासातून साध्य झालेल्या तथ्यांकडेही वेगळ्या प्रकारे पाहता येईल व त्यांचा अन्वयही लावता येईल. बालसंगोपणासाठीची काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वेही यातून हाती येतात. त्यांपैकी काही भारतीय समाजात दीर्घकाळ टिकून होती. त्यांची कदाचित आधुनिक संदर्भात पुनःप्रस्थापना करावी लागेल, काही बदल अपरिहार्यपणे करावे लागतील.
विकासप्रक्रियेचा आवाका : मूल जन्माला येते तेव्हापासूनच त्याच्याभोवती सामाजिक संदर्भ असतो. त्याची एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून कार्य करू लागेपर्यंत जी वाटचाल होते, तिचे विशेष खालीलप्रमाणे:
(१) शारीरिक दृष्ट्या अर्भक ते पूर्ण वाढ झालेला देह घडणे.
(२) संपूर्ण परावलंबित्वापासून संपूर्ण स्वावलंबी बनणे.
(३) सामाजिक अजाणतेपासून प्रावीण्यापर्यंत पोहोचणे.
(४) जीवनात जबाबदारीची जाणीव निर्माण होणे.
विकासप्रक्रियेची रूपरेखा : विकासाच्या अनेक संकल्पना वर सांगितलेल्या सैद्धांतिक भागात आल्या आहेत. त्यांमधून आज सर्वमान्य तत्त्वे हाती लागली आहेत, ती पुढीलप्रमाणे :
(१) गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत वाढ आणि गुणात्मक बदल या दोन्ही प्रकारे विकास घडतो.
(२) विकासाची गती सर्व कालखंडात सारखी नसते. एकवीस वर्षापर्यंत जलद, एकवीस ते चाळीस स्थिर आणि त्यानंतर उतार असा या गतीत बदल होतो.
(३) विकास पायरीपायरीने होतो. एक बदल घडल्यानंतर तो पचनी पडण्यात काही वेळ जातो आणि पुढचा टप्पा येतो. या प्रत्येक पायरीवर काही ठराविक वैशिष्ट्ये आढळतात.
(४) शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, व्यक्तिमत्त्व संघटनात्मक असे अनेक पैलू विकसित होत असतात. परंतु त्यांचा वेग वेगवेगळा असतो. त्यांचा एकमेकांवर परिणामही होत असतो.
(५) आधीच्या कालखंडात झालेला विकास पुढील कालखंडातील विकासाचा आधार ठरतो. त्यामुळे पहिल्या सहा वर्षांतील विकास महत्त्वाचा मानला जातो.